यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दिला जाणारा यंदाचा राज्यस्तरीय पारितोषिक वंचित घटक आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या ‘कोरो इंडिया’ या संस्थेला प्रदान करण्यात आला. संस्थेचे कार्यक्रम संचालक महेंद्र रोकडे आणि कार्यक्रम व्यवस्थापक मुमताज शेख यांनी हा पुरस्कार स्वीकारत संविधानाच्या चौकटीत राहून लोकसहभागातून काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रसंगी सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी यशवंतराव चव्हाण यांचे विचार आणि कार्य आजच्या ‘जेनझी’ पर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. सध्या सुशिक्षित आणि तरुण पिढीही अंधश्रद्धेच्या आहारी जात असल्याबद्दल चिंता व्यक्त करत, धोरणनिर्मिती आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची सांगड घालण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. तसेच कोरो इंडियाच्या ‘राईट टू पी’ चळवळीचे कौतुक करत भविष्यात एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

याच सोहळ्यात निवड समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी सन २०२६ चा ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ हेमलकसा येथील आदिवासी पट्ट्यातील समाजसेवा आणि वन्यजीव संवर्धनाच्या कार्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांना जाहीर केला. यासोबतच मुंबई विद्यापीठाच्या एल.एल.एम. परीक्षेत प्रथम आलेल्या ॲड. श्रीनिवास कस्तुरी यांना न्या. वाय. व्ही. चंद्रचूड पारितोषिक प्रदान करण्यात आले. उपाध्यक्ष अरुण गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता बाळसराफ यांनी केले, तर सुजाता खांडेकर, अदिती नलावडे, डॉ. प्रज्ञा दया पवार, लक्ष्मण माने यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]
दिनांक : 
25 November 2026

वीडियो गॅलरी