वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल जागतिक कीर्तीच्या शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांना सन २०२३ चा प्रतिष्ठित ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यशवंतराव चव्हाण यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त मुंबईत आयोजित सोहळ्यात हा सन्मान स्वीकारताना डॉ. स्वामीनाथन यांनी, 'योग्य माहितीचा प्रसार आणि लोकांचा विश्वास यांद्वारे साथीच्या रोगांवर मात करता येते,' असे सांगत विज्ञान-संशोधनातील गुंतवणुकीचे महत्त्व अधोरेखित केले. निवड समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी डॉ. स्वामीनाथन यांच्या जागतिक कार्याचा गौरव केला; तर चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सौ. सुप्रिया सुळे यांनी संस्थेच्या तीन दशकांतील समाजाभिमुख कार्याचा आढावा घेत चव्हाण साहेबांच्या विचारांशी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली.

अध्यक्षीय भाषणात यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष श्री. शरदचंद्र पवार यांनी चव्हाण साहेबांच्या दूरदर्शी व सर्वसमावेशक विकासविचारांचे स्मरण केले, तसेच डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख करत त्यांच्या कन्या डॉ. सौम्या यांच्या सन्मानाबद्दल समाधान व्यक्त केले. या दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनपटावर आधारित नवीन संकेतस्थळाचे लोकार्पणही करण्यात आले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]
दिनांक : 
12 March 2024