यशवंतराव चव्हाण सेंटर आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) यांच्या संयुक्त विद्यमाने २४ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईत ‘बुवाबाजीविरोधी महिला राज्य परिषद २०२६’ पार पडली. राज्यभरातील सुमारे ६०० महिला प्रतिनिधींच्या उत्स्फूर्त सहभागातून या परिषदेत बुवाबाजी, महिलांचे शोषण आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार या विषयांवर सखोल विचारमंथन झाले.
प्रख्यात कवयित्री नीरजा यांच्या हस्ते अंधश्रद्धेच्या पिंजऱ्यातून महिलेची प्रतीकात्मक मुक्तता करून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. महिलांनी कर्मकांड व दैववाद नाकारून मन, मेंदू आणि मनगटाच्या जोरावर पुरोगामित्व जपावे, असे आवाहन त्यांनी केले. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे होते, तर प्रमुख पाहुण्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी छद्मविज्ञानावर टीका करत अंनिसच्या कार्याचे कौतुक केले. यानंतर डॉ. प्रदीप पाटकर व डॉ. अनिल डोंगरे यांनी बुवाबाजीचे मानसशास्त्रीय विश्लेषण केले, तर ‘जेन-झी टॉक ऑन बुवाबाजी’ सत्रात तरुणांनी ऑनलाइन फसवणूक आणि शोषणाविरोधात परखड मते मांडली.
समारोप सत्रात अभिनेत्री अनिता दाते यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून भयमुक्त समाज घडवण्याचे आवाहन केले, तर राज्य अध्यक्ष माधव बावगे यांनी बुवाबाजीविरोधी अभियानाचा आढावा घेतला. या परिषदेत जादूटोणाविरोधी कायद्याची नियमावली तयार करून तो देशभर लागू करणे आणि २०२७ च्या कुंभमेळ्याचा खर्च कमी करून तो निधी दुष्काळ निवारणासाठी वापरणे, यांसह सहा महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. ‘हम होंगे कामयाब’ या सामूहिक गीताने परिषदेची सांगता झाली.



