दि. ८ ऑगस्ट: नव्या पिढीतील कलाकारांच्या अविष्काराला हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी सूर विश्वास हा अनोखा उपक्रम विश्वास ग्रृप तर्फे सुरू करण्यात आला आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि., विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यमाने होत असून, विश्वास ग्रृप चे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक आहेत व संकल्पना विनायक रानडे यांची आहे.
शनिवार दि. १० ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी ६.३० वा. नव्या पिढीतील गायिका कल्याणी दसककर-तत्त्ववादी यांच्या गायनाचे सातवे पुष्प गुंफले जाणार आहे. ईश्वरी दसककर (हार्मोनियम),सारंग तत्त्ववादी (तबला) हे साथसंगत करणार आहेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. स्मिता मालपुरे करणार आहेत.
अॅडमिनिस्ट्रेटीव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड ट्रेनिंग हब,ठाकूर रेसिडेन्सी,विश्वास गार्डन शेजारी,विश्वास को-ऑप. बँकेसमोर,सावरकरनगर,गंगापूर रोड,नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.कल्याणी दसककर यांचे आजोबा पं. प्रभाकर दसककर,काका श्री. माधव दसककर आंतराष्ट्रीय किर्तीचे हार्मोनियमवादक श्री. सुभाष दसककर यांच्याकडे लहानपणापासून शास्त्रीय संगीताचे शिक्षण झाले.
त्यानंतर आठ वर्ष जयपूर-अत्रौली घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका सौ. मंजिरी आसनारे-केळकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे तर गेल्या चार वर्षांपासून जयपूर किराणा व ग्वाल्हेर घराण्याच्या जेष्ठ व सुप्रसिद्ध गायिका डॉ. अलका देव,मारूलकर यांच्याकडे समग्र गायकीचे शिक्षण घेत आहेत. एस.एम.आर.के. महिला महाविद्यालयातून संगीत विषयात एम.ए. पदवी घेतली असून मुंबईच्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या शास्त्रीय गायन आणि हार्मोनियम वादनात विशेष योग्यता मिळवून विशारद झालेले आहे. युवा महोत्सव खंडवा,मध्यप्रदेश,पारनेर येथील वसंतोत्सव,जळगांव येथील बालगंधर्व महोत्सव,स्पिक मॅकेतर्फे नादभेद,देवगांधार महोत्सव अशा अनेक महोत्सवांत त्यांनी सादरीकरण केले आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयीन स्तरावर व तसेच विविध कार्यक्रमांमधून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून अनेक पारितोषिके मिळवलेली आहेत. पुणे येथील सूरश्री प्रतिष्ठानचा पुरस्कार,कोल्हापूर येथील गोविंदराव गुणे स्मृती पुरस्कार,पुणे येथील गानवर्धनचा कै. सरला नारायण कुलकर्णी स्मृती शास्त्रीय गायन पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम या कार्यक्रमासाठी राहुल भावे (पद्मावती केटरर्स) यांचे सहकार्य लाभले आहे. तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वास ठाकूर व विनायक रानडे यांनी केले आहे.