नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार १ सप्टेंबर व रविवार २ सप्टेंबर २०१८ रोजी सुप्रसिद्ध स्विडीश इंगेमार बर्गमन फिल्म उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर चित्रपट क्लब हाऊस, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहेत.
इंगेमार बर्गमन यांचा सिनेमा जागतिक सिनेमा सृष्टीत क्लासिक किंवा अभिजात म्हणून ओळखला जातो. मानवी संबंधांची गुंतागुंत, अनेक मानव निर्मित संस्था व सामाजिक अनुबंध व त्यातील परस्पर व्यवहार यावर भाष्य करणारा त्यांचा सिनेमा अनुभव विश्व समृद्ध करणारा आहे. त्यांच्या सिनेमातील पात्रे व प्रतिमासृष्टी सिनेमाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात. अत्यंत मनस्वी, कलंदर अशा बर्गमन यांनी तटस्थपणे व तीव्रपणे मानवी संवेदनांचा, सबंधांचा व व्यवहारांचा शोध घेतला.
शनिवार १ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी ४.३० ते ५.३० या वेळेत बर्गमन यांच्या कारकीर्दीचा वेध घेणार्या लघुपटाचे सादरीकरण होणार आहे.रविवार २ सप्टेंबर २०१८ रोजी दुपारी २ ते रात्री ९ या वेळेत बर्गमन यांनी दिग्दर्शित केलेले खालील चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.१)वाईल्ड स्ट्रॉबेरीज : हा एक रूपकात्मक रोड मुव्ही आहे. चित्रपटात वर्तमान आणि भूतकाळ, स्वप्न आणि सत्य ह्यांचा सतत लपंडाव चालू रहातो. एका वयोवृद्ध प्राध्यापकाचा ह्या बाह्य आणि त्याच्या अंर्तजगताचा शोध अत्यंत मनोरंजक आहे. सदर चित्रपट १९५७ मध्ये प्रदर्शित झालेला असून कालावधी ९१ मिनीटांचा आहे.
२)सेवन्थ सील : युरोपातील धर्मयुद्धांचा कालखंड, प्लेगच्या साथीनी थैमान घातलेले ह्या पार्श्वभूमीवर एक सरदार व त्याचा उचभ्रु मित्र एका मोहिमेवरून घरी येत असतात. मृत्युचे, भितीचे, रोगराईचे, स्वदेशातील वातावरण त्यांना खिन्न करते. त्यातच त्यांची गाठ प्रत्यक्ष मृत्युशी पडते. सरदार मृत्युबरोबर बुद्धीबळाचा पट मांडतो. मृत्युला सरदाराचे नियतीतून सुटका नाही याची खात्री असते. त्यातुन अनेक मुलभूत तात्विक प्रश्न निर्माण होतात. बर्गमनच्या प्रतिभेचा उत्तुंग अविष्कार म्हणजे सेवन्थ सील. सदर चित्रपट १९५७ मध्ये प्रदर्शित झालेला असून कालावधी ९६ मिनीटांचा आहे.
३) समर इंटरल्युड : ही मारीची एका बॅलेरीनाची गोष्ट आहे. स्वान लेक ह्या बॅलेचा सराव चालू असतांना तिला टपालाने पाठविलेली एक डायरी मिळते. तेरा वर्षांपूर्वी तीची एका हेन्सीक नावाच्या तरूणाशी गाठ पडलेली असते. त्यातून त्या दोघांची मैत्रीही जुळते. तेरा वर्षांनी तिच्या आयुष्यात घडलेल्या सर्व घटनांच्या कडु गोड स्मृती त्या डायरीच्याद्वारे जाग्या होतात. सदर चित्रपट १९५१ मध्ये प्रदर्शित झालेला असून कालावधी ९६ मिनीटांचा आहे.
४) ऑटम सोनाटा : जगप्रसिद्ध पियानो वादक शार्बेट आणि तिच्या मुलींच्या संबंधांची ही नाट्यमय कहाणी आहे. शार्लोट आता निवृत्तीनंतरचे जीवन जगत आहे. तिच्या वादनाच्या कारकिर्दीत तिचे आपल्या इव्हा व हेलेन ह्या मुलींकडे दुर्लक्ष झाले आहे. इव्हाच्या घरी ती येते. तेथे तिची हेलेन ह्या तिच्या मतीमंद मुलीशीही गाठ पडते. इव्हा व शार्लोट ह्यांच्या भेटीमध्ये इतक्या वर्षांच्या तणावाचे निराकरण होते कां? सदर चित्रपट १९७८ मध्ये प्रदर्शित झालेला असून कालावधी १०० मिनीटांचा आहे.
हे चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.