छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि. १८ : यशवंतराव चव्हाण सेंटर - जिल्हा केंद्र छत्रपती संभाजीनगर व एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुंबई येथून प्रकाशित होणार्या सचिन परब संपादित ‘रिंगण’ या वार्षिकांकाचा प्रकाशन सोहळा सोमवार, दि. २४ जुलै २०२३ रोजी सायं. ५ वा. आइन्स्टाइन सभागृह, जेएनईसी महाविद्यालय, एमजीएम कॅम्पस, औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेला आहे. संत परिसा भागवत यांच्यावर यंदाचा विशेषांक असणार आहे. महाराष्ट्रधर्माला ललामभूत ठरणाऱ्या महात्म्याच्या कर्तृत्वाचा समग्र वेध घेणारा यंदाचा विशेषांक आहे.
प्रसिद्ध कवी प्रा. दासू वैद्य यांच्या हस्ते अंकाचे प्रकाशन संपन्न होणार आहे. याप्रसंगी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबईचे कार्यक्रम संयोजक दत्ता बाळसराफ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या जिल्हा केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. रिंगण अंकाचे संपादक सचिन परब व समीक्षक डॉ. कैलास अंभुरे यांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती असणार आहे.
‘रिंगण’ अंकाचे यंदाचे अकरावे वर्ष असून दरवर्षी संतपरंपरेतील एका संतावर हा विशेषांक आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रकाशित होणारा महाराष्ट्रातील एकमेव प्रयोग आहे. या अंकात केवळ संतांच्या अभंगांचे व विचारांचे निरूपण नसून, संतांनी मांडलेला विचार आजच्या काळातही कसा लागू आहे याबद्दलची मांडणी, तसेच मुक्त पत्रकारांनी या संतांच्या जन्म व कार्यस्थळांवर जाऊन तयार केलेले रिपोर्ताज आदी बाबींवर आधारीत लेख प्रकाशित करण्यात आलेले आहेत.
या विशेष कार्यक्रमास सर्वांसाठी प्रवेश खुला असून संतपरंपरेतील अभ्यासक, विद्यार्थ्यांनी तसेच नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.