- Display Youtube Video:
- Awards Content:
- वर्ष: 2023, पुरस्कार प्रकार: मराठी साहित्य संस्कृती पारितोषिक, Youtube Video:
- Awards Content:
- वर्ष: 2019, पुरस्कार प्रकार: ग्रामीण विकास/आर्थिक-सामाजिक विकास
- Awards Content:
- वर्ष: 2020, पुरस्कार प्रकार: मराठी साहित्य-संस्कृती / कला
- Awards Content:
- वर्ष: 2021, पुरस्कार प्रकार: विज्ञान-तंत्रज्ञान
- Awards Content:
- वर्ष: 2024, पुरस्कार प्रकार: मराठी साहित्य संस्कृती पारितोषिक, Youtube Video:
महाराष्ट्राला जसा जाज्वल्य संघर्षाचा इतिहास लाभला आहे, तशी या इतिहासाला कालचक्राच्या अंधारातून मुक्त करत त्यावर प्रकाश टाकणाऱ्या इतिहासकारांची परंपरा ही लाभली आहे. महाराष्ट्राच्या अशा थोर इतिहास संशोधनाच्या परंपरेतील एक तपस्वी व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. जयसिंगराव पवार होय. ज्यांनी आयुष्यभर इतिहास संशोधनाचा ध्यास घेतला आणि आपल्या तत्त्वांशी प्रामाणिक राहून इतिहास लेखनावर अव्यभिचारीनिष्ठा ठेवली अशा धैर्यशील परंपरेचे डॉ. पवार एक पाईक आहेत.
सांगली जिल्ह्यात जन्माला आलेल्या डॉ. जयसिंगराव भाऊसाहेब पवार यांनी 1964 मध्ये इतिहास या विषयात एम ए ही पदवी विद्यापीठात प्रथम येऊन मिळवली. एम ए झाल्यावर शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू व थोर इतिहास संशोधक डॉ.आप्पासाहेब पवार यांनी त्यांची मराठा इतिहास विभागात संशोधन सहाय्यक म्हणून 1964 साली निवड केली. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी डॉ. पवारांच्या हाती शिवकालीन इतिहासाची कागदपत्रे पडली आणि प्राध्यापक व्हायला निघालेले डॉ. पवार ऐन तारुण्यात इतिहास संशोधक बनले. शिवाजी विद्यापीठातील संशोधन प्रशिक्षणामुळे डॉ.पवारांची संशोधक म्हणून जडणघडण झाली.
वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी डॉ. पवार यांनी इतिहासात उपेक्षित राहिलेल्या कोल्हापूरकर महाराणी जिजाबाई यांचा इतिहास आपल्या पहिल्या शोधनिबंधातून प्रथम प्रकाशात आणला. या त्यांच्या शोधांचे कौतुक थोर इतिहासकार श्री न.र.फाठक यांनी खुल्या अधिवेशनात सर्वोत्कृष्ट शोधनिबंध म्हणून केले आणि इतिहास संशोधक म्हणून डॉक्टर पवारांनी सुरू केलेल्या वाटचालीत हा शोध निबंध मैलाचा दगड ठरला.
शिवाजी विद्यापीठाच्या सेवेत असतानाच डॉ. पवार यांना थोर इतिहास पंडित सेतू माधवराव पगडी आणि इतिहास संशोधक वा.सी.बेंद्रे यांचा प्रदीर्घ सहवास लाभला. ते एक प्रकारचे संशोधन प्रशिक्षणच होते. डॉ.पवार या दोन्ही विद्वानांना आपल्या गुरुस्थानी मानतात. इतिहास संशोधन क्षेत्रातील पहिले धडे डॉ. आप्पासाहेब पवार, पंडित सेतू माधवराव पगडी व वा.सी बेंद्रे यांच्याकडून घेतले असे डॉ. पवार कृतज्ञतेने नमूद करतात.
डॉ. पवार यांनी आपल्या संशोधकीय वाटचालीत अनेक इतिहास परिषदांच्या व्यासपीठावरून 45 हून अधिक शोधनिबंध सादर केले आहेत. यात मराठीशाहीच्या अज्ञात पैलूंवर संशोधन करून मराठा इतिहासाची पुनर्मांडणी केली आहे. यात शिवरायांनी घडवून आणलेली सामाजिक क्रांती , शिवराज्याभिषेकाचा अन्वयार्थ, सूर्याजी पिसाळ फितुरीतून दोष मुक्त , संभाजी महाराज व राजाराम महाराजांच्याअज्ञात राण्या, छत्रपतीं राजारामाचा अनौरस पुत्र राजा कर्ण यासारख्या अनेक अज्ञात विषयांवर प्रकाश टाकला.
1992 मध्ये डॉ. पवारांनी The Maratha State Under Rajaram या विषयावर पीएचडी ही पदवी प्राप्त केली. विशेष म्हणजे शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासातील विदाऊट गाईड पीएचडी सादर केलेला हा पहिला व शेवटचा प्रबंध होता. डॉ. पवार यांनी 1965 मध्ये हातामध्ये घेतलेली लेखणी आजतागायत खाली ठेवलेली नाही. स्वाभाविकच त्यांची ग्रंथसंपदा विपुल झाली आहे. डॉ. पवारांनी आपल्या कारकीर्दीत 32 इतिहास ग्रंथांचे लेखन केले आहे. त्यामध्ये शिवछत्रपती, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज ,महाराणी ताराबाई , सेनापती संताजी घोरपडे, राजर्षी शाहू छत्रपती,क्रांतिसिंह नाना पाटील इत्यादी विषयांवरील ग्रंथ प्रामुख्याने सांगता येतील.
शाहू संशोधन केंद्राचा संचालक म्हणून डॉक्टर पवार यांनी बारा खंडाचे संपादन केले आहे. यामध्ये प्रो. लठ्ठ्यांचे शाहू चरित्र, लाटकर शास्त्री कृत संस्कृत मधील शाहू चरित्र, डॉ. बाळकृष्ण स्मृती ग्रंथ,डॉ. ब्रानकृष्णांचा शिवाजी द ग्रेट ग्रंथ, इंग्रजी व मराठी क्षात्रजगतगुरुंचे विचार दर्शन,कोल्हापूरचा पंचगंडात्मक इतिहास हे विशेष उल्लेखनीय ग्रंथ आहेत. डॉक्टर पवारांनी लिहिलेल्या अनेक ग्रंथांना विविध संस्थांनी पुरस्कार देऊन गौरविले आहे. आजवर सामाजिक व साहित्य क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल डॉक्टर पवारांना एकूण 30 पुरस्कार मिळाले आहेत. त्यापैकी काही असे, जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार, कोल्हापूर भूषण पुरस्कार, फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार, आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार, सत्यशोधक दिनकर जवळकर पुरस्कार, मराठा मंदिर जीवन गौरव पुरस्कार, भाई वैद्य पुरस्कार हे विशेष उल्लेखनीय पुरस्कार आहेत.
महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या आणि डॉ. चौधरी नावाच्या गृहस्थाने संपादन केलेल्या कोल्हापूर गॅझेटियर मध्ये राजर्षी शाहू महाराजांचे चारित्र्यहनन करण्याचा हेतूपुरस्सर प्रयत्न केला होता. डॉ. पवारांनी पुराव्यानिशी हे विकृतीकरण खोडून काढून शासनाला सत्य इतिहासावर आधारित नवा मजकूर गॅझेटियर मध्ये घालण्यास भाग पाडले. अशाप्रकारे राजर्षी शाहूंवर झालेल्या अन्यायाचे निवारण करण्यात डॉ.पवार यशस्वी झाले.
1989-90 मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या हुतात्म्याची त्रिशताब्दी सर्वत्र साजरी केली गेली त्यानिमित्ताने डॉ. पवार यांनी छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ प्रकाशित करून स्वराज्याच्या या दुसऱ्या छत्रपती च्या व्यक्तिमत्त्वावर व कामगिरीवर अनेक अंगानी प्रकाश टाकून त्याच्या तेजस्वी पराक्रमी व स्वातंत्र्यप्रेमी प्रतिमा समाजासमोर सादर केली या ग्रंथास डॉक्टर पवार यांनी 165 पानांची विवेचक प्रस्तावना लिहून संभाजी महाराजांवरील आरोपांचे खंडन केले. अशा प्रकारचा स्मारक ग्रंथ हा मराठीतील पहिला ग्रंथ आहे ज्याने धर्मवीर संभाजी महाराजांना स्वातंत्र्यवीर ठरवले गेले.
मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध 1681 ते 1707 हे मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्णयोग मानले जाते. छत्रपती संभाजी, छत्रपती राजाराम व महाराणी ताराबाई हे या युगाचे खरे नायक आहेत. पैकी छत्रपती संभाजीराजांवर बऱ्यापैकी चरित्र ग्रंथ निर्माण झाले असले तरी राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांची चरित्र उपेक्षित राहिली होती. डॉ. पवारांनी सतत दहा वर्ष संशोधन करून शिवपुत्र राजाराम महाराज हा बृहद चरित्र ग्रंथ लिहून प्रकाशित केला मराठ्यांच्या इतिहासातील हे पहिले राजाराम चरित्र होय या ग्रंथात राजाराम महाराजांच्या राजनैतिक मुत्सद्येगिरीवर प्रथमच प्रकाश टाकला गेला महाराष्ट्र शासनाचा इतिहासातील सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणून राजाराम चरित्रास पुरस्कार मिळाला.
डॉ. रिचर्ड इटन या अमेरिकन इतिहासकाराच्या मते महाराणी ताराबाईंच्या पराक्रमास जगाच्या इतिहासात तोड नाही आशिया खंडातील सर्वात बलाढ्य सत्ताधीश औरंगजेब बादशहाशी मराठ्यांच्या या राणीने सात वर्ष लष्करी संघर्ष करून पराभूत केले. तिचे चरित्र कोणाही इतिहासकारांनी लिहिले नव्हते. डॉ.पवारांनी पंधरा वर्षे संशोधन करून मराठीतील पहिले ताराबाई चरित्र लिहून प्रकाशित केले हा ग्रंथ सुमारे 800 पानांचा हा ग्रंथ म्हणजे डॉ. पवारांच्या कामगिरीतील Magnum Opus मानला जातो या ग्रंथालाही महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देऊन गौरविले आहे.
राजर्षीं शाहू यांच्याविषयी वाटणाऱ्या अपार्य कृतज्ञतेच्या भावनेने डॉ पवारांनी राजर्षी शाहू पंचखंडात्मक स्मारक ग्रंथ प्रसिद्ध केला. सुमारे 2000 पानांचा व पाचशेच्या छायाचित्रांचा हा मराठीतील पहिला बृहद स्मारक ग्रंथ आहे. मा. शरद पवार साहेबांच्या प्रेरणेने शाहू चरित्र विविध भाषांमध्ये आणण्याचा महत्त्वकांक्षी प्रकल्प डॉ. पवारांनी हातात घेतला असून त्यांनी आजवर शाहू चरित्र मराठी, कन्नड, कोकणी, तेलगू ,गुजराती ,सिंधी ,बंगाली, तामिळ, इत्यादी भारतीय भाषात व इंग्रजी, जर्मन, इटालियन, रशियन अशा विदेशी भाषेत आणले आहे. जगातील एकूण 25 भाषामध्ये शाहू चरित्र आणण्याचा डॉ.पवार यांचा मानस असून हा मराठी साहित्य क्षेत्रातील एक विक्रमच मानला जाईल. डॉक्टर पवारांच्या शाहू ग्रंथामुळे फुले आंबेडकर या शृंखलेतील मधला शाहूंचा दुवा अधिक प्रकाशमान झाला शाहूंच्या युग कार्याचे अनेक अज्ञात पैलू प्रकाशात आले. हा ग्रंथ महाराष्ट्रात घरोघरी गेला आणि फुले शाहू आंबेडकर हा महाराष्ट्राचा ब्रँड तयार झाला.
महाराष्ट्राच्या इतिहासाचे संशोधन व त्याद्वारे समाज प्रबोधन या उद्दिष्टाने डॉ. पवार यांनी सन 1992 मध्ये महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी या संस्थेची स्थापना केली. इतिहासाला वाहिलेली ही दक्षिण महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था आहे.
डॉ.जयसिंगराव पवारांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात इतिहासाबद्दल अनेक वाद निर्माण झाले. या वादामुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक व सामाजिक जीवन ढवळून निघाले.या वादांमध्ये डॉ.पवार यांनी संशोधन करून सत्य इतिहास समाजासमोर मांडला. डॉ. पवारांच्या सत्यान्यवेशी इतिहास लेखनाचा गाभा हा इतिहासातील दुर्लक्षित, वंचित घटकांना न्याय मिळवून देणे, त्यांच्या कार्याची इतिहास लेखनात नोंद करणे आणि या सर्वातून समाज प्रबोधन करणे हा आहे. म्हणूनच त्यांच्या आयुष्याचे आणि त्यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी या संस्थेचे ब्रीद इतिहासो हि राष्ट्रस्य समाजस्य प्रबोधकः असे आहे. हेच डॉ. पवार यांच्या इतिहास लेखनाचे सूत्र आहे.
डॉ. जयसिंगराव भाऊसाहेब पवार यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक २०२४’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.