- Awards Content:
- वर्ष: 2024, पुरस्कार प्रकार: शेती-पाणी पुरस्कार
गोंदिया, जिथे एकेकाळी भातशेतीचे वर्चस्व होते. त्याच भागात एका परिवर्तनाची कहाणी सुरु झाली.
अविरत कष्ट करूनही पारंपारिक भातशेतीतून मिळणारे उत्पन्न कमी होत असल्याचे शीला ताईंना जाणवले. हीच ती बदलाची वेळ हे त्यांना लवकर कळले आणि स्वत:सह सभोवतालच्या शेतकरी समुदायाला देखील त्याचा फायदा होईल, या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू झाले.
अवघ्या 2.30 हेक्टर जमिनीच्या जीवावर त्यांनी धाडस करायचे ठरवले. तांदूळ या पिकाची शेती न करता नाविन्यपूर्ण शेती तंत्रासह टरबूज, पेरू, सफरचंद आणि बेरी या फळांची लागवड केली. बाजारपेठेत जास्त मागणी असल्यामुळे अपेक्षेपेक्षा एकरी जास्त उत्पादन झाले. ठिबक सिंचन आणि बोअरवेल यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा त्यांनी योग्य वापर करून घेत आपले उत्पादन वाढवले. पाण्याचा प्रत्येक थेंब आणि मातीचा प्रत्येक इंचाचा त्यांनी हुशारीने वापर केला. जिद्द आणि चिकाटीच्या साथीला धोरणात्मक दृष्टीकोन असला की काहीच अवघड नसते, हे त्यांनी त्यांच्या कार्यातून दाखवून दिले.
आपल्या गावातील बाकी शेतकऱ्यांना देखील शीला ताईंनी मार्गदर्शन करण्यास सुरवात केली. नवीन शेतीपद्धती अमलात आणण्यासाठी बाकी शेतकऱ्यांना त्या वेळोवेळी प्रेरित करत राहिल्या. थोडक्या शेतीवर त्यांनी आपले संपूर्ण जीवनमान बदलून टाकले.
एक शेतकरी, एक मार्गदर्शक शीला खुणे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा शेती-पाणी या प्रकारासाठी यावर्षीचा “ना.धो. महानोर पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
- Awards Content:
- वर्ष: 2024, पुरस्कार प्रकार: शेती-पाणी पुरस्कार
यवतमाळ जिल्ह्यातील आष्टी या गावाच्या मातीत अनेक सामर्थ्याच्या कथा आहेत, एक विलक्षण कहाणी सापडते. वर्षा नरेंद्र हाडके या स्त्रीचा प्रेरणादायी शेती प्रवास याच गावात सापडतो.
वर्षा ताईंचे आयुष्य खूप आशादायी आणि सुंदर चालले होते परंतु नियतीच्या मनात वेगळेच काही होते. त्यांच्या पतीचे अचानक निधन झाले आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी वर्षा ताईंवर आली. शेतीशिवाय दुसरे कोणतेच उत्पन्न नसल्यामुळे अनेक कठीण प्रसंगांचा सामना त्यांना करावा लागला.
कापूस आणि सोयाबीन ही एकमेव पिके होती आणि शेतीत सिंचन नसल्यामुळे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे होते. या सर्व प्रश्नांना फाटा देत, हार न मानता अथक परिश्रम चालूच ठेवले. शेतीसह स्वत:ला देखील बदलण्यचा विचार केला. शेतीत नाविन्यपूर्ण सिंचन तंत्र वापरण्यास सुरुवात केली त्याचा परिणाम म्हणजे शेतीतील उत्पन्न दुप्पट झाले. अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न झाले.
एका बाजूला आनंद द्विगुणीत होत असताना एक दुसरे वादळ त्यांच्या आयुष्यात आले. स्तनाच्या कर्करोगाशी त्यांची वैयक्तिक लढाई सुरु झाली. गावात चर्चेला उधान आले. परंतु वर्षा ताई न डगमगता आपला प्रवास सुरु ठेवला.
वर्षा ताईंना डॉक्टर फक्त जगण्याची आशा दाखवत होते. डॉक्टरांनी प्रयत्न थांबवले होते. वर्षा ताईंनी जगण्याची धडपड चालूच ठेवली. नव्या दमाने, नव्या जोमाने, सर्व शक्तीनिशी त्या पुन्हा शेतात परतल्या. जमीन आणि भीतीवर त्यांनी पुन्हा विजय मिळविला.
वर्षा ताईंनी आधुनिक तंत्रज्ञान आणि स्व शक्तीच्या जोरावर एक शाश्वत शेती उभा केली. जिद्द आणि चिकाटीचा एक उत्तम उदाहरण म्हणजे वर्षा ताई हाडके !
आपल्या कहाणीने सर्वांच्या आयुष्यात आशा निर्माण करणाऱ्या वर्षा नरेंद्र हाडके यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा शेती-पाणी या प्रकारासाठी यावर्षीचा “ना.धो. महानोर पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
- Awards Content:
- वर्ष: 2024, पुरस्कार प्रकार: साहित्य पुरस्कार
मुंबईतील वडाळ्यात राहणाऱ्या एका साहित्यिकाने खूपच कमी वयात साहित्य क्षेत्रात आपला ठसा उमटवला. त्यांचे नाव प्रदीप कोकरे !
मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात पदव्युत्तर पदवी मिळविल्यानंतर, प्रदीप कोकरे यांची शब्दांबद्दलची आवड आणखीनच वाढत गेली. ‘मुंबई शहरावर लिहिलेल्या मराठी कवितांचा अभ्यास’ या विषयावर शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे ते पीएचडी करत आहेत.त्यांच्या या संशोधनामुळे मुंबई आणि सांस्कृतिक जडणघडण यावर प्रकाश टाकला जाईल, ही खात्री आहे.
युगवाणी, खेळ, मुक्त शब्द, अभिधानंतर, कवितारती, लोकसत्ता, काव्याग्रह, वर्णमुद्रा इत्यादी नियतकालिकांमधून त्यांच्या कविता प्रकाशित झाल्या आहेत. तसेच लोकवाङ्मय गृह प्रकाशन संस्थेचे सहाय्यक संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीसाठी प्रदीप यांना मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे प्रतिष्ठित वृत्तपत्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या कादंबरीस २०२२ - २३ सालची ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन लिटरेचर’ यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात आली. ‘माझा साहित्यिक प्रवास वृद्धिंगत राहण्यासाठी ही फेलोशीप माझ्यासाठी खूप महत्वाची आहे’ असं मत प्रदीप वेळोवेळी करत आले आहेत.
जीवन आणि संस्कृती यांची सांगड घालत साहित्यविश्व जगणारे नव्या दमाचे अभ्यासक, लेखक, कवी प्रदीप कोकरे यांना ‘कादंबरी’ या साहित्य प्रकारासाठी पहिला यशवंतराव चव्हाण सेंटरचा “ना.धो. महानोर पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
- Awards Content:
- वर्ष: 2024, पुरस्कार प्रकार: साहित्य पुरस्कार
२००६ साली नामदेव कोळी यांनी आपल्या लिखाणास सुरुवात केली. बाहेती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जळगाव येथे त्यांनी सलग नऊ वर्षे अध्यापनाचे कार्य केले. सध्या ते भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य येथे अनुवादक म्हणून कार्यरत आहेत. शब्दांच्या सामर्थ्याच्या जोरावर त्यांनी अक्ख्या महाराष्ट्रात आपला डंका गाजवला आहे.
नामदेव यांचा 2020 साली प्रकाशित झालेला ‘काळोखाच्या कविता’ हा काव्यसंग्रह खूप कमी वेळात वाचकांच्या पसंतीस उतरला. समाजाच्या अनेक अव्यक्त भावना या काव्यसंग्रहात वाचायला मिळतात. तसेच त्यांनी ‘नव-अनुष्टुभ’ याचे सहाय्यक संपादक म्हणून देखील काम पाहिले आहे. तसेच सध्या ‘वाघुर’ या दिवाळी अंकाचे संपादक म्हणून ते काम पाहतात. 'लोकसत्ता', 'लोकमत', 'दिव्य मराठी' यांसारख्या प्रतिष्ठित दैनिकांमध्ये त्यांच्या लेखनास स्थान मिळाले आहे. आकाशवाणी आणि रेडिओ सिटीवरून प्रसारित होणारे त्यांचे काव्यवाचन आजही अनेकांना प्रेरणा देते.
हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती आणि इतर भाषेतील साहित्य अनुवादांद्वारे ते आपल्या साहित्य संस्कृतींना जोडतात. नामदेव यांच्यासारख्या साहित्यीकामुळे साहित्य विश्वाला सीमांच्या पलीकडे नेऊन ठेवले आहे. हा साहित्य प्रवास जपत असताना नामदेव यांनी काळोखाच्या पलीकडे असणाऱ्या भावनांना आवाज दिला आहे.
हरहुन्नरी साहित्यिक नामदेव कोळी यांना कविता या साहित्य प्रकारासाठी यावर्षीचा यशवंतराव चव्हाण सेंटरचा “ना.धो. महानोर पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
- Awards Content:
- वर्ष: 2024, पुरस्कार प्रकार: साहित्य पुरस्कार
सोलापूर जिल्ह्यातील माढा या तालुक्यातील हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणजे महेश लोंढे ! इंग्रजी विषयात बी.ए.ची पदवी मिळवून त्यांनी शिवाजी विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला व प्रतिष्ठित धनंजय कीर पारितोषिक जिंकले. त्यांचे इंग्रजी साहित्यावरील प्रेम एवढ्यावरच थांबले नाही. पुढे पुणे विद्यापीठातून प्रथम श्रेणी ऑनर्ससह एमए केले आणि यशस्वीरित्या यूजीसी नेट देखील उत्तीर्ण झाले. सध्या पुणे येथे महेश लोंढे आयकर उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत.
या अधिकारी विश्वाच्या पलीकडे महेश हे संवेदनशील कवी आहेत. २०१७ साली ‘'निद्रानाशाची रोजनिशी” हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. ‘आत्मा ढवळून काढणारे शब्द’ या कवितासंग्रहात वाचायला मिळतात. या काव्यसंग्रहास अनेक प्रतिष्ठित पुरस्कार देखील मिळाले आहेत.
नवाक्षर दर्शन, कविता-रति, खेळ, मौज, नव- अनुष्टुभ, अभिधानंतर, महा-अनुभव, परिवर्तनाचा वाटसरू इ. नियतकालिकांमधून त्यांच्या कविता प्रकाशित झाल्या आहेत.
स्केचिंग, अनुवादक, साहित्यिक, अधिकारी अशा अनेक कलागुणांसह महेश यांचे व्यक्तिमत्व उजळून निघाले आहे.
एक कर्त्तृत्ववान अधिकारी, साहित्यिक महेश लोंढे यांना कविता या साहित्य प्रकारासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशवंतराव चव्हाण सेंटरचा “ना.धो. महानोर पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.