
- Awards Content:
- वर्ष: 2023, पुरस्कार प्रकार: राज्यस्तरीय पुरस्कार, District: कल्याण
मूळच्या कल्याण येथील रहिवासी असलेल्या मीनल ठाकोर यांनी पुणे युनिव्हर्सिटी मधून मास्टर इन सोशल वर्क केले. तसेच त्या सुगम संगीत विशारद देखील आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जेजे हॉस्पिटल येथे "मेडिकल सोशल वर्कर" म्हणून काम पाहिले. जवळपास ३५ वर्षे त्यांनी सेवा दिली आणि सेवानिवृत्त झाल्या. परंतु त्यांच्यातील सामाजिक जाणीव त्यांना शांत बसू देत नव्हती. या ना त्या प्रकारे त्यांनी सामाजिक कार्य चालूच ठेवले.
वृद्धापकाळात ज्येष्ठ नागरिक मानसिक दृष्ट्या सक्षम व्हावेत, त्यांनी छंद जोपासावेत, आत्मकेंद्री ज्येष्ठांना बोलते करणे यासाठी मीनल ठाकोर नेहमी समुपदेशन करतात. ज्येष्ठांसाठी सरकारी योजना, कायदे, यांसाठी जनजागृतीपर व्याख्यानांचे आयोजन करणे. तसेच कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी बालमजुरी, बालविवाह, बालभिक्षुकी देखील रोखण्याचा प्रयत्न केला आहे. Work for cause and not applause हे ब्रीद त्यांनी कायम जोपासले आहे.
त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या एकूण कार्याचा यथोचित सन्मान वेळोवेळी झाला आहे. प्लॅन इंडिया दिल्लीचा नॅशनल अवॉर्ड त्यांना मिळाला आहे. "आजी आजोबांचे घर" ही त्यांची अनोखी संकल्पना लवकरात लवकर पूर्ण व्हावी, या सदिच्छा...!
मीनल ठाकोर यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा पहिला "यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक पुरस्कार" देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.

- Awards Content:
- वर्ष: 2023, पुरस्कार प्रकार: राज्यस्तरीय पुरस्कार
सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक, विभाग प्रमुख ते कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू असा प्रवास केलेले श्रीरंग कद्रेकर, आपल्या अनुभवांच्या जोरावर अनेक समाजोपयोगी कामे करत आहेत. वय वर्ष ९४ होऊन देखील त्यांचा कामाचा उत्साह एखाद्या तरुणाला लाजवेल असाच आहे.
कृषी क्षेत्राची त्यांना खूपच आवड असल्यामुळे स्थानिक तरुणांना एकत्र घेऊन मातृवृक्ष जोपासण्यासाठी कलमे बांधणीची प्रशिक्षण वर्ग त्यांनी सुरू केला. आजपर्यंत त्यांनी अनेक शेती विषयक व्याख्याने, कार्यशाळा घेतल्या आहेत. तसेच ग्रामविकास मंडळाच्या कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन त्यांच्या मार्फत आधुनिक शेतीचे तंत्र खेड्यात पोहोचविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. गावागावातून कृषी विकास युवक मंडळे स्थापन केली. यासह त्यांना साहित्याची देखील आवड आहे. "लाल मातीत रंगलो मी" या त्यांच्या आत्मचरित्रात कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार देखील मिळाला आहे.
विद्यार्थ्यांसाठी गणपती विसर्जनावेळी नदी, ओढे तसेच समुद्रावर निर्माल्य संकलन व त्याचे गांडूळ खतामध्ये परिवर्तन, वृक्ष लागवड, ओढ्यावर वनराई बंधारे बांधणे, पर्यावरण प्रबोधन कार्यक्रम अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्रे आयोजित केली.
तरूणांमध्ये कृषी विषयक जागृती निर्माण करून त्याचा प्रचार व प्रसार करण्याचे काम श्रीरंग कद्रेकर करत आहेत. खऱ्या अर्थाने पर्यावरणीय विकासाचा पाया खेडेगावातून रचण्यात येतोय, हे नमूद करावे लागेल.
श्रीरंग कद्रेकर यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा "यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक पुरस्कार" देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.

- Awards Content:
- वर्ष: 2023, पुरस्कार प्रकार: राज्यस्तरीय पुरस्कार
एम आय टी शिक्षण संस्था पुणे येथे विशेष कार्य अधिकारी या पदावर अण्णासाहेब टेकाळे कार्यरत आहेत. श्री दत्त साई मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसाला आर्थिक मदत केली. विद्यार्थ्यांना शालेय आवश्यक वस्तूंचे मोफत वाटप करून त्यांच्या शिक्षणास हातभार लावला. दुष्काळी परिस्थितीत पंचक्रोशीतील ग्रामपंचायतींना तीन हजार शिधा किटचे वाटप केले. याच ट्रस्टच्या माध्यमातून गेली सतरा वर्ष मोफत वैद्रद्यकीय शिबिराचे आयोजन देखील केले गेले.
ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सरकार दरबारी मांडून योग्य तो न्याय त्यांना मिळवून देण्याचे काम अण्णासाहेबानी केले आहे.
७५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांना एस.टी. चा मोफत प्रवास मिळावा, तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ सरसकट सर्व जेष्ठांना रु.५ लाख पर्यंत मिळावा यासाठी यशस्वी प्रयत्न केले.
त्यांनी केलेल्या कार्यासाठी महाराष्ट्र शासनाचा ज्येष्ठ पुरस्कार, फेसकॉमचा जीवन गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
जे का रंजले गांजलेसी म्हणे जो आपुले, तो चि साधु ओळखावा, देव तेथें चि जावा ||
या संत तुकारामांच्या अभंगावर चालू असलेला त्यांचा हा प्रवास असाच अखंड चालू राहो, या सदिच्छा !
अण्णासाहेब टेकाळे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा "यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक पुरस्कार" देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.

- Awards Content:
- वर्ष: 2023, पुरस्कार प्रकार: राज्यस्तरीय पुरस्कार
समविचारी सहकाऱ्यांना घेऊन रेखा बागुल यांनी १९८२ रोजी डोंबिवली मध्ये कर्णबधिरांसाठी शाळा २ चालू केली. पुढे त्याचे अस्तित्व या संस्थेत विलीन करण्यात आले. त्या शाळेत रेखा यांनी प्राचार्यपदावर काम केले. तसेच दापोलीतील इंदिराबाई बडे कर्णबधिर विद्यालयात त्या सचिव म्हणून कार्यरत आहेत.
रेखा ताईंनी १९९२ मध्ये घरातच "नचिकेत वाचा श्रवण प्रशिक्षण केंद्र" सुरू केले. आजतागायत ते केंद्र चालू आहे. या केंद्रात उत्तम भाषा आणि इतर विषयांची चांगली तयारी त्या करून घेतात. त्यामुळे सामान्य मुलांच्या शाळेत शिकून ही कर्णबधिर मुले आज वेगवेगळ्या मोठ्या पदावर कार्यरत आहेत.
रेखा बागुल यांनी कै. गणेश दातार वृद्धाश्रमाची स्थापना केली. यामध्ये ३० ज्येष्ठ नागरिक आपले छंद जोपासत आयुष्य घालवत आहेत. या वृद्धाश्रमावर रेखा बागुल यांना प्रतिक्रिया विचारल्यावर त्या म्हणतात, "दापोली सारख्या ग्रामीण भागात देखील वृध्दाश्रमाची गरज भासणे, हे दुर्दैवच ! कोणत्याच ज्येष्ठावर अशी वेळ येऊ नये आणि कोणी वेळ आणू देखील नये."
कौटुंबिक हिंसाचारामुळे घराबाहेर पडलेल्या स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मिळेल ती मदत आणि लागेल तो आधार देण्याचे काम देखील रेखा बागुल करत असतात. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात देखील आले आहे.
गेली ४२ वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या रेखा बागुल यांची लवकरच फिफ्टी व्हावी, या सदीच्छा !
रेखा बागुल यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा "यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक पुरस्कार" देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.