वैशाली घुगे
यशस्विनी कृषी सन्मान
2026
एकाच म्हशीच्या दुधावर चालणाऱ्या संसाराला सोबत घेऊन जगणाऱ्या या स्त्रीची कहाणी केवळ संघर्षाची नाही, तर अशक्य गोष्ट शक्य करणाऱ्या जिद्दीची आहे! ती स्त्री म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील अंदूर गावच्या वैशाली बाळासाहेब घुगे…! २००६ मध्ये 'स्वयं शिक्षण प्रयोग' या संस्थेशी त्या जोडल्या गेल्या आणि त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली. आपल्यातील नेतृत्वगुण आणि अभ्यासू वृत्तीच्या जोरावर २०१४ मध्ये त्यांनी 'यशदा'मधून विशेष प्रशिक्षण पूर्ण केले. पाहता पाहता त्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी 'स्टेट ट्रेनर' बनल्या आणि हजारो महिला लोकप्रतिनिधींसाठी एक सक्षम मार्गदर्शक म्हणून उदयास आल्या.
वैशालीताईंचा एकच ठाम विश्वास होता, 'निसर्गाशी जुळवून घेतलेली शेती हीच खरी प्रगती!' याच विचारातून त्यांनी केवळ १० गुंठे जमिनीमध्ये सेंद्रिय शेतीचा एक क्रांतिकारक प्रयोग उभा केला. सेंद्रिय पद्धती, गांडूळ खत निर्मिती, अझोला चारा तंत्रज्ञान आणि गावरान पोल्ट्रीचा असा काही नेटका मेळ घातला, की या अवघ्या १० गुंठ्यांच्या तुकड्याने सर्वांचे डोळे दीपवून टाकले. निसर्गाचे भान राखून केलेल्या या शास्त्रीय शेतीतून आज त्या वर्षाला तब्बल १० ते १२ लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहेत!
पण वैशालीताईंचा हा प्रवास केवळ स्वतःच्या प्रगतीपुरता मर्यादित राहिला नाही. मग तो भीषण दुष्काळ असो किंवा कोरोनाचा कठीण काळ... त्यांनी संकटालाच संधी बनवत हजारो महिलांना रोजगाराचे भक्कम साधन निर्माण करून दिले. डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या नामांकित 'वेध' मंचापासून ते महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यांपर्यंत पोहोचून त्यांनी सेंद्रिय शेतीची आणि महिला सक्षमीकरणाची एक नवी क्रांती घडवून आणली!
मातीशी घट्ट नाळ जोडून पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या, पारंपरिक शेतीला नवसंजीवनी देणाऱ्या आणि हजारो महिलांच्या अंधारमय आयुष्यात आशेची प्रकाशज्योत उजळणाऱ्या वैशाली बाळासाहेब घुगे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा “'यशस्विनी सन्मान पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.



