संध्या नरे- पवार

यशस्विनी पत्रकारिता सन्मान
मुंबई
2024

गेली ३४ वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात चौफेर मुशाफिरी करणाऱ्या संध्या नरे-पवार सध्या नवशक्ति दैनिकात फिचर एडिटर म्हणून काम करत आहे. सर्वसामान्य माणूस, शेतकरी, महिला व त्यांचे प्रश्न हे त्यांच्या पत्रकारितेचे कायम सूत्र राहिले आहे. समाजातील वंचित- उपेक्षित घटकांसाठी त्या सातत्याने लिखाण करतात. आपल्या संशोधनपर लेखातून त्यांनी समाजातील विविध विषय हाताळले आहेत, अनेक प्रश्न तडीस नेले.

१९९० पासून त्यांनी त्यांच्या पत्रकारितेस सुरुवात केली. ११९३ पासून ते २०१६ पर्यंत साप्ताहिक चित्रलेखा मध्ये तब्बल २३ वर्षे काम केले. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या दैनिकांमध्ये त्यांची सदरे प्रसिद्ध झाली आहेत. ‘डाकिन’, ‘तिची भाकरी कोणी चोरली?’ ही त्यांची गाजलेली पुस्तके ! या पुस्तकांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.

समाजातील वंचित घटकाला पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संध्या ताई भरीव कामगिरी करीत आहेत. समाजातील विधायक बाजू दाखवत असताना प्रस्थापित यंत्रणेला जाब विचारणे हेच पत्रकाराचे काम असते, हे समाजभान त्यांच्या कार्यातून सातत्याने दिसते. त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रीय पातळीवरचा ‘लाडली मिडिया अवार्ड’, मुंबई मराठी पत्रकार संघटनेचा ‘पद्मश्री यमुनाबाई खाडिलकर पुरस्कार’, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचा ‘सुधारककार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार’ असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

समाजातील शेवटचा माणूस हा पत्रकारितेचा केंद्रबिंदू असायला हवा हे ब्रीद कामय जोपासणाऱ्या संध्या नरे-पवार यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशस्विनी पत्रकारिता सन्मान २०२४’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.