रुक्मिणी नागापुरे
यशस्विनी सामाजिक सन्मान
बीड
2024
आधुनिक युगात महिला शिकली व स्वावलंबी झालेली असली तरी देखील महिलांवरील अन्याय व अत्याचार अद्याप थांबलेले नाहीत. महिलांवरील अत्याचाराचा टक्का हा आजही बऱ्यापैकी आहेच. देशपातळीपासून ते ग्रामपंचायतीपर्यंत महिलांना सक्षम करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी विविध संघटना काम देखील करत आहेत. या संस्थांपैकी एक संस्था म्हणजे कोरो एकल महिला संघटना. या संस्थेच्या संस्थापिका आहेत रुक्मिणी नागापुरे.
गेल्या ९ वर्षांपासून महिलांना भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांवर त्या सातत्याने कार्यरत आहेत. सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, आर्थिक या विषयांवर अविरत त्यांचे काम चालू आहे. समाजातील महिलांना सामावून घेत समाजातील अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी त्यांचे कमालीचे प्रयत्न चालू आहेत.
कोरो एकल महिला संघटना ही महिलांचे आरोग्य, त्यांचा रोजगार, महिलांचे राजकिय अस्तित्व, समाजातील अनिष्ट रुढी परंपरांना यांना छेद देणे तसेच महिलांना विविध हक्क व अधिकार प्राप्त होण्यासाठी व महिलांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी ही संघटना काम करते. समाजात वावरताना आपणास एकल महिला मोठ्या संख्येने समोर दिसत आहेत. विधवा, परित्यक्ता, घटस्फोट झालेल्या, पतीला सोडलेल्या, पतीने सोडलेल्या, अपंग, प्रौढ कुमारी या प्रकारच्या एकूण ६० टक्के महिलांचा समावेश यामध्ये होतो. रुक्मिणी यांनी एकल महिलांचे संघटन करून त्यांना समाजात सन्मानाचे स्थान मिळवून दिले आहे, असे म्हणाले तर वावगं ठरणार नाही. एकल महिलांचे अर्धवट शिक्षण पूर्ण करून देण्यास त्यांनी मदत केली तसेच रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून विविध उद्योग देखील त्यांनी सुरु केले आहेत.
रुक्मिणी नागपुरे यांच्या कार्याची भरभराट व्हावी, या सदिच्छा. रुक्मिणी नागपुरे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशस्विनी सामाजिक सन्मान २०२४’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.