भारती नागेश स्वामी

यशस्विनी कृषी सन्मान
कराड, सातारा
2023

शेती आणि माती हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. शेतकरी पिकवतो म्हणून आपण सकस अन्न खाऊ शकतो. जमिनीची सुपीकता, पाण्याची बचत, बीज निर्मिती या सगळ्याभोवती शेती हा विषय फिरतो. आपल्या शेतीतील पिकाचा दर्जा टिकून राहावा, मातीचा दर्जा टिकावा म्हणून गेली २५ वर्षे रासायनिक खतांचा वापर न करता भारती नागेश स्वामी यांनी शेती केली आहे. त्यामुळे जमिनीचा दर्जा टिकून राहिला. “ज्या देशाची वरची चार इंच माती शाबूत आहे तोच देश जिवंत राहू शकतो या जॉर्ज कार्व्हर यांच्या वाक्याने प्रेरित होऊन भारती ताईंचा प्रवास चालू आहे. प्रयोग परिवाराचे श्रीपाद दाभोलकर सरांनी दिलेल्या ‘गणिती , हुकमी ,विक्रमी आपण प्रयोग करूया !’ या विचारांवर त्यांचा प्रवास चालू आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील म्हणायचे “स्वावलंबी शिक्षण हेच आमचे बीद्र” ! शिक्षण जसे स्वावलंबी झाले पाहिजे त्याचप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याने स्वावलंबी झाले पाहिजे, यासाठी भारती ताई प्रयत्नशील आहेत.

बियाणांपासून ते मार्केटींगपर्यंत आपण स्वावलंबी कसे व्हावे? हे शेतकऱ्यांना शिकवण्यासाठी ‘मोकाट कृषी विद्यापीठाची’ स्थापना केली. शेती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी गावातील मुलांना लहानपणापासूनच शेती आणि माती हा विषय समजून सांगण्यात त्या अग्रेसर आहेत. तसेच त्यांनी महिलांचे बचत गट स्थापन केले आहेत. ‘आधी केले नि मग सांगितले’ या विचारांच्या प्रेरणेतून बीज संकलन ,संवर्धन ,गुणन ,प्रचार ,प्रसार याद्वारे सेंद्रिय शेतीची सुरवात व्हावी या भावनेतून त्यांच्या शेतीचा जीवनप्रवास चालू आहे. “या विश्वाची समृद्धी व तृप्ती आमच्या या गावात आम्हाला मिळो.”अशी त्यांची इच्छा आहे.

शेती आणि माती यांची सेवा करणाऱ्या भारती नागेश स्वामी यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशस्विनी कृषी सन्मान २०२३’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

Video Gallery