मनस्विनी लता रवींद्र
यशस्विनी साहित्य सन्मान
पुणे
2022
लहानपणापासून आपल्या लेखनासाठीचे पोषक वातावरण असणाऱ्या घरात आपला जन्म झाला. लेखक म्हणून आपल्या लेखन प्रवासाची सुरुवात आपल्या लहानपणीच झाली आणि उत्तरोत्तर तो प्रवास 'दिल दोस्ती दुनियादारी' च्या टप्प्यावर पोहोचला. सिनेमा, नाटक, मालिका या माध्यमात लेखिका म्हणून आपण आपली वेगळी ओळख निर्माण केलीत. आपण लिहिलेली 'अमर फोटो स्टुडिओ', 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' ही नाटक तरुणांच्या पसंतीस उतरली. 'दिल दोस्ती दुनियादारी' आणि 'बन मस्का' या गाजलेल्या मालिकेतून आपण घरोघरी पोचलात. एकीकडे दिल दोस्ती सारख्या मालिका लिहून आपण तरुणांच्या मनातील भाव भावनांचा निचरा घडवून आणलात तर दुसरीकडे 'रमा माधव' या वेगळ्या धाटणीच्या ऐतिहासिक सिनेमाची पटकथा आणि संवाद लिहून, ऐतिहसिक क्षणांना उजळणी करून दिलीत.
'आभाळाचे गाणे', 'सिगारेट अलविदा', 'ब्लॉगच्या आरशा पल्याड' ही आपली इतर साहित्यसंपदा! आपण लिहिलेल्या 'सिगारेट अलविदा' या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा तर 'ब्लॉगच्या आरशापल्याड' या पुस्तकास महाराष्ट्र शासन आणि साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार आपणास प्राप्त झाला. मालिका, सिनेमा ते साहित्य क्षेत्रातील आपल्या योगदानाबद्दल आपणास यशवंतराव चव्हाण सेंटरचा पहिला "यशस्विनी साहित्य सन्मान" पुरस्कार प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे. आपला लेखनप्रवास उत्तरोत्तर बहरत राहो, या सदिच्छा.