श्वेता पाटील

युवा साहित्य पुरस्कार
2025

लोडशेडिंगची एक रात्र... करमत नाही म्हणून हातात पडलेलं पहिलं पुस्तक... आणि नेमका तिथूनच सुरू झाला शब्दांशी जोडलेला एक अनोखा प्रवास!

जळगावच्या पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वरची ‘श्वेता पाटील’! आई-वडील शेतमजूर, पण घरातूनच श्वेताला वाचनसंस्कृतीचं बाळकडू मिळालं. गावातील 'हरेश्वर वाचनालयातून' सुरू झालेली ही वाचनाची ओढ, पुढे पुण्याच्या नामांकित 'फर्ग्युसन कॉलेजमध्ये' अधिकच समृद्ध झाली.

सोशल मीडिया असो की 'लोकमत', 'लोकसत्ता' आणि 'दिव्य मराठी'सारखी अग्रगण्य वृत्तपत्रं, श्वेताची लेखणी आत्मविश्वासाने गर्जू लागली. अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटीतून एम.ए. करत असतानाच, त्यांच्या संवेदनशीलतेतून पहिली कादंबरी जन्माला आली— ‘आपल्याला काय त्याचं…’! या पहिल्याच कादंबरीला २०२२ सालचा महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठित 'यशवंतराव चव्हाण वाड्मय पुरस्कार' मिळाला.

पुढे २०२४ मध्ये ‘निळ्या डायरीची गोष्ट’ आणि 'पारिजात' सारख्या पत्रांच्या सिरीजमधून त्यांनी वाचकांच्या मनाचा वेध घेतला. त्यांच्या लेखणीने नेहमीच बहुजन युवक-युवतींच्या स्वप्नांना आणि संघर्षाला हक्काची वाट करून दिली. वाचन आणि लेखनाच्या बळावर पिंपळगाव ते थेट 'युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन'पर्यंत त्यांनी मारलेली भरारी थक्क करणारी आहे! तिथून त्यांनी 'जेंडर आणि इंटरनॅशनल डेव्हलपमेंट'मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.

आपल्या लेखनातून जेंडर, कास्ट आणि क्लासच्या प्रश्नांवर अत्यंत ठोस आणि धारदार भाष्य करणाऱ्या श्वेता पाटील यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा “यशवंतराव चव्हाण युवा साहित्य पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

Video Gallery