सुकांत कदम
युवा क्रीडा पुरस्कार
2025
सांगली जिल्ह्यातील आटपाडी या दुष्काळी तालुक्यातील 'कौठुळी' नावाच्या गावात जन्मलेल्या सुकांत कदम यांचा क्रीडा प्रवास थक्क करणारा आहे.
आयुष्याच्या सुरुवातीलाच नशिबाने त्यांची कठीण परीक्षा घेतली. शारीरिक मर्यादांचे अडथळे समोर होते, पण सुकांत यांची स्वप्नं त्याहून मोठी होती. शिक्षणाची ओढ त्यांना कौठुळीच्या शेताशिवारातून थेट पुण्याच्या गजबजलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत घेऊन गेली. घरात आर्थिक चणचण आणि मनात भावनिक द्वंद्व असतानाही, जिद्दीच्या जोरावर त्यांनी अभियांत्रिकीची पदवी प्रथम श्रेणीत पूर्ण केली.
पण सुकांत यांचं खरं जग केवळ पुस्तकात नव्हतं, तर ते होतं बॅडमिंटनच्या कोर्टवर! बॅडमिंटन ही त्यांची केवळ ओळख उरली नाही, तर ती त्यांची शक्ती बनली. अथक परिश्रमांच्या जोरावर त्यांनी बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत थेट 'प्रथम' स्थानी झेप घेतली.
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पदक थोडक्यात हुकलं खरं... पण ज्यांच्या रक्तातच जिद्द असते, ते कधीच थांबत नाहीत! २०२५ मध्ये 'आशियाई चॅम्पियन' आणि २०२६ मध्ये थेट 'वर्ल्ड चॅम्पियन' बनून त्यांनी तिरंगा सातासमुद्रापार तिरंगा अभिमानाने फडकवला.
"तुमचा जन्म कुठल्या परिस्थितीत झाला, यापेक्षा तुम्ही स्वतःला कुठे नेऊन ठेवता, यावर तुमचं भविष्य ठरतं!" हे सुकांतने जगाला दाखवून दिलं आहे.
आज त्यांचा हा संघर्ष केवळ एका खेळाडूचा संघर्ष नाही, तर लाखो तरुणांसाठी यशाचा राजमार्ग आहे. भारताची शान आणि जगाचा विजेता असलेल्या सुकांत कदम यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा “यशवंतराव चव्हाण युवा क्रीडा पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.



