सुशांत देसाई
युवा उद्योजक पुरस्कार
2025
तंत्रज्ञानाच्या साथीने ग्रामीण विकासाचा ध्यास घेतलेला जिद्दी तरुण म्हणजे सुशांत देसाई. यंत्र अभियंता असूनही त्यांनी आपल्या मातीशी नातं जपलं. शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन ॲग्रीकल्चरच्या माध्यमातून मिळालेल्या प्रेरणेतून त्यांनी 'देसाई उद्योग समूहा'ची मुहूर्तमेढ रोवली. 'राईस मिल'पासून सुरू झालेला हा प्रवास आज पशुखाद्य निर्मिती आणि महिला गृहोद्योगापर्यंत विस्तारला आहे. स्थानिकांना रोजगार आणि शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळवून देणारं हे एक 'एकात्मिक मॉडेल' ठरलंय. कोल्हापूरच्या डोंगराळ भागातून सुरू झालेला हा जिद्दी प्रवास सध्या देशभर सुरु आहे.
राईस मिलमधील उपपदार्थांवर प्रक्रिया करून त्यांनी दर्जेदार 'पशुखाद्य' तयार केलं, यामुळे मालाचे टिकाऊपण वाढले आणि शेतकऱ्यांच्या नफ्यात ४० टक्क्यांहून अधिक वाढ झाली. आज १०० हून अधिक पशुसेवा केंद्रांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण युवकांना गावातच रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. ३०० हून अधिक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला हक्काचा दर मिळवून दिलाय. 'वेस्ट टू वेल्थ' ही संकल्पना प्रत्यक्षात आणत, भात तुसापासून इंधन आणि पर्यावरणपूरक वस्तू बनवण्याचं त्यांचं स्वप्न आता साकार होतंय.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला 'लोकल टू ग्लोबल' नेणाऱ्या सुशांत देसाई यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा “यशवंतराव चव्हाण युवा उद्योजक पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.



