प्रियांका तुपे

युवा पत्रकारिता पुरस्कार
2025

तीस सेकंदांच्या रील्स आणि फेक न्यूजच्या झगमगाटात, संविधानाशी बांधिलकी जपत 'ग्राऊंड झिरो'वर उतरून सत्याचा शोध घेणारी एक निर्भीड पत्रकार म्हणजे प्रियांका तुपे ! पुण्याच्या भोर तालुक्यातील कारी गावची ही कन्या आज राष्ट्रीय स्तरावर आपल्या पत्रकारितेचा ठसा उमटवत आहे. २०१५ मध्ये सुरू झालेला हा प्रवास 'सकाळ', 'लोकसत्ता' ते थेट 'आऊटलूक'पर्यंत पोहोचला आहे. 'बहनबॉक्स'मध्ये त्यांनी स्त्रियांवरील अत्याचारांचे वास्तव मांडणारे एक स्वतंत्र 'न्यूज बीट' यशस्वीपणे चालवले.

विस्तृत ग्राऊंड रिपोर्टिंग हेच प्रियांका यांच्या पत्रकारितेचे शक्तिस्थान आहे. भारतातील जातीव्यवस्था, शेतकरी महिलांचे दुर्लक्षित प्रश्न आणि भटक्या-विमुक्त समुदायांचे जगणे त्यांनी पत्रकारितेच्या केंद्रस्थानी आणले. त्यांच्या या निष्ठावान कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित 'कमला मानकेकर अवॉर्ड' आणि 'सुधाकरराव डोईफोडे युवा पत्रकारिता पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले आहे.

केवळ वार्तांकनच नव्हे, तर 'कास्ट मॅटर्स' सारख्या महत्त्वाच्या ग्रंथांचा अनुवाद आणि 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन लिटरेचर'च्या माध्यमातून त्यांचं वैचारिक कार्यही सुरू आहे. सध्या 'आऊटलूक' मासिकात सहाय्यक संपादक म्हणून कार्यरत असलेल्या प्रियांका, लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सातत्याने 'जनकेंद्री' पत्रकारिता करत आहेत.

निर्भीड आणि संविधानिक मूल्यांचा वारसा जपणाऱ्या प्रियांका तुपे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा “यशवंतराव चव्हाण युवा पत्रकारिता पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

Video Gallery