श्रीकांत बंगाळे
युवा पत्रकारिता पुरस्कार
2025
"प्रश्न विचारणं सोपं असतं, पण ते प्रश्न प्रत्यक्ष जगणं आणि तळागाळातील विदारक सत्य समोर आणणं जास्त महत्त्वाचं असतं... आणि हीच खरी ओळख आहे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची! याच चौथ्या स्तंभाचा शिलेदार म्हणजे श्रीकांत बंगाळे !
पुण्याच्या प्रतिष्ठित रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेचे धडे गिरवल्यानंतर, मागील ९ वर्षांपासून ते माध्यम क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवत आहेत. २०१७ पासून 'बीबीसी न्यूज मराठी'चे प्रतिनिधी म्हणून कार्यरत असणाऱ्या श्रीकांत यांच्या पत्रकारितेचा कणा म्हणजे शेती, कष्टकरी आणि ग्रामीण महिलांचे प्रश्न!
त्यांच्या 'गावाकडची गोष्ट' या विशेष सीरिजने लोकप्रियतेचे शिखर गाठले. १७६ भागांच्या या प्रदीर्घ प्रवासातून त्यांनी केवळ सरकारी योजनाच लोकांपर्यंत पोहोचवल्या नाहीत, तर प्रशासकीय त्रुटींवरही बोट ठेवले. मग तो समृद्धी महामार्गाचा वास्तववादी रिपोर्ट असो किंवा खतांच्या काळाबाजाराचा पर्दाफाश; श्रीकांत यांनी आपल्या धारदार प्रश्नांनी सत्तेला नेहमीच जाब विचारला.
त्यांच्या शब्दांत 'मातीचा सुगंध' आहे आणि आवाजात 'सत्याची धार' आहे. याच निर्भीड पत्रकारितेची पावती म्हणून त्यांना 'रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नलिझम' आणि 'रेडइंक' सारख्या देशातील सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या 'हागणदारीमुक्त महाराष्ट्र' या ग्राउंड रिपोर्टला जागतिक स्तरावर 'बीबीसी बेस्ट ऑन-साईट इम्पॅक्ट अवॉर्ड' मिळणे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरली.
केवळ बातम्या देणं हा त्यांचा उद्देश नाही, तर समाजाला लागलेली व्यसनाधीनतेची कीड असो वा गोरक्षणाच्या नावाखाली होणार लिंचींग; यावर त्यांनी अत्यंत धाडसाने प्रकाश टाकला.
पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचं स्वप्न डोळ्यांत घेऊन चालणाऱ्या श्रीकांत बंगाळे या ध्येयवेड्या तरुणाला यशवंतराव चव्हाण सेंटरचा “यशवंतराव चव्हाण युवा पत्रकारिता पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.



