पूर्वा महाजन
युवा इनोव्हेटर पुरस्कार
2025
पर्यावरणाचा समतोल आणि आरोग्याची काळजी या दोन्ही गोष्टींचा मेळ घालणारी एक अनोखी संकल्पना पूर्वा महाजन यांनी शोधून काढली आहे. केळीच्या वाया जाणाऱ्या खोडापासून लहान मुलांसाठी आणि वयोवृद्धांसाठी 'इको-फ्रेंडली' डायपर्स तयार करण्याची किमया त्यांनी साधली आहे. ही प्रेरणा त्यांना त्यांच्या आईच्या स्टार्टअपमधून मिळाली.या स्टार्टअपमध्ये केळीच्या खोडापासून सॅनिटरी आणि मॅटर्निटी पॅड्स तयार केले जातात. केवळ कल्पना डोक्यात न ठेवता पूर्वा यांनी १०० हून अधिक वयोवृद्ध आणि १३० आईंसोबत संवाद साधून त्यांच्या गरजा समजून घेतल्या. दीड वर्षांच्या कठोर मेहनतीतून त्यांनी हे उत्पादन विकसित केले आहे. प्लॅस्टिकमुक्त आणि पूर्णपणे विघटनशील असे हे उत्पादन आहे. त्वचेला त्रास न देणारे, रॅश-फ्री आणि सुरक्षित असे हे डायपर्स पर्यावरणाचा कचरा कमी करण्यास मदत करतात. या उपक्रमातून त्यांनी महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.Waste to Wealth निर्माण करण्याचा हा एक यशस्वी प्रयत्न आहे.
शाश्वत भविष्यासाठी नाविन्यपूर्ण पाऊल उचलणाऱ्या पूर्वा महाजन यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा “यशवंतराव चव्हाण युवा इनोव्हेटर पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.



