प्रसाद गावडे
युवा सामाजिक पुरस्कार
2025
कोकणची माती, तिथलं पाणी आणि तिथलं जंगल यांच्याशी रक्ताचं नातं जपणारा एक अवलिया म्हणजे प्रसाद गावडे. पर्यावरण अभ्यासक, अनुभवी शिक्षक आणि संपूर्ण महाराष्ट्रात ‘कोकणी रान माणूस’ म्हणून प्रसाद गावडे यांची ओळख आहे. प्रसाद यांनी निसर्गालाच आपलं सर्वस्व मानून शाश्वत जीवनशैलीचा मंत्र घराघरात पोहोचवला. गाव, जंगल आणि नद्या वाचवण्यासाठी ते सतत कार्यरत आहेत. पारंपरिक शेतीपासून ते स्थानिक खाद्यसंस्कृतीपर्यंतच्या आपल्या समृद्ध वारशाचं ते जतन करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरण आणि मच्छीमारांच्या समस्यांना वाचा फोडली.
गावकेंद्रित अर्थव्यवस्था कशी टिकेल, हाच त्यांचा ध्यास आहे. 'जीवनशाळा' आणि 'मी राखणदार' यासारख्या उपक्रमांतून ते पुढच्या पिढीला निसर्गाशी जोडत आहेत. बाजारकेंद्री विकासापेक्षा स्थानिक स्वावलंबन हीच त्यांची विचारधारा आहे. कोकणातील पर्यावरण संवर्धन आणि समाजप्रबोधनासाठी त्यांना 'URL फाउंडेशन'च्या सामाजिक गौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
निसर्गाचा खरा राखणदार प्रसाद गावडे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा “यशवंतराव चव्हाण युवा सामाजिक पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.



