मयुर शितोळे

युवा रंगमंचीय कलाविष्कार पुरस्कार
2023

लहानपणापासूनच मयुर यांना नृत्याची आवड होती आणि यामध्येच त्यांना करिअर करायचे स्वप्न होते परंतु घरात एकुलता एक मुलगा असल्यामुळे घरच्यांमुळे अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले.

या शिक्षणा दरम्यान त्यांनी शास्त्रीय नृत्याबद्दलची आवड जोपासली. आई वडिलांना कळू न देता त्यांनी प्राजक्ता अत्रे यांच्या नृत्यभारती संस्थेत रीतसर शिक्षणास सुरुवात केली. २०१२ मध्ये अभियांत्रिकीमध्ये प्रथम श्रेणी मिळवून त्यांनी कॉर्पोरेट जगतात प्रवेश केला. ते करत असताना गुरु रोहिणी भाटे यांच्या मार्गदर्शनामुळे एका छंदाचा प्रवास जीवन ध्येय होऊन बसला, असे मयुर ठामपणे सांगतो.

पुढे काहीच कालावधीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात मयुर यांनी कथकमधील पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला. अशोक व रिचा मित्तल यांच्या आर्थिक सहकार्यामुळे त्यांचे शिक्षण सुवर्णपदकासह पूर्ण झाले.

मयुर यांना आतापर्यंत शाताई आपटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ मिळणारी शिष्यवृत्ती आणि कथक नृत्यांगना व गुरू श्रीमती सुनीता पुरोहित यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारी शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.

मयुर यांनी आजपर्यंत अनेक संरचना सादर केल्या. यामध्ये ‘मी वस्त्रवती’, डार्विनच्या सिद्धांतावर आधारित ‘इव्होल्यूशन?’ संत तुकारामांच्या अभंगावर ‘सुई धागा’ 'Gender is a social construct’ या विचारावर आधारित ‘लिपस्टिकचा वारसा’, तसेच ‘देवदास’ या कादंबरीवर ब्रॉडवे शैलीतील बॅलेचे कामही त्यांनी केले आहे.

नवीन प्रयोग आणि नृत्य रचनांसह त्यांचा प्रवास सुरूच आहे. नृत्य चळवळीच्या माध्यमातून कथा विणण्याचा आणि कथकच्या जगावर अमिट छाप सोडण्याचा त्यांचा निर्धार सत्यात उतरविण्यासाठी त्यांना खूप शुभेच्छा !