शाहीर सुमित धुमाळ
रंगमंचीय कलाविष्कार पुरस्कार
2022
आपला महाराष्ट्र सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न आहे. याच महाराष्ट्राला लोककलेचा वारसा लाभला आहे. या लोककलेतूनच लोकरंगभूमी जिवंत आहे. याच रंगभूमीवरील उगवता तारा म्हणजे शाहीर सुमित धुमाळ…! मूळचे औरंगाबादचे (छत्रपती संभाजीनगर) असणारे सुमित, यांना लहानपणापासूनच पारंपारिक गोंधळी कलेचे शिक्षण वडील शाहीर रामदास धुमाळ यांच्याकडून मिळाले. हे मिळालेले बाळकडू त्यांनी जोपासले आणि कला आत्मसात केली. शाळा, महाविद्यालयात असताना पोवाडे, भारुड, पथनाट्य, जागरण गोंधळ अशा लोककलांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. सन २०१२ साली महाराष्ट्र राज्य आयोजित पोवाडे प्रशिक्षणात सहभाग घेतला आणि तिथे शाहीरसम्राट देवानंद माळी यांची ओळख झाली. तेव्हापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाहिरी कलेवर सुमित यांनी लक्ष केंद्रित केले आणि पुढे स्वतःचा स्वतंत्र शाहिरी कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रभर चालू केला.
आजच्या घडीला लोककला अकादमी, मुंबई येथे डॉ. गणेश चंदनशिवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील लोककलेचे शिक्षण सुमित धुमाळ घेत आहेत. आपल्या लोककलेच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे विषय सुमित धुमाळ हाताळत असतात. आपल्या शाहिरीच्या कार्यक्रमात ऐतिहासिक पोवाड्यांबरोबरच सामाजिक प्रबोधन करणारे विषय देखील ते हाताळत असतात. आतापर्यंत व्यसन मुक्ती, लेक वाचवा, स्वच्छता मोहीम, बेटी बचाओ बेटी पढाओ, झाडे लावा झाडे जगवा, स्त्री भ्रूण हत्या अशा अनेक विषयांवर त्यांनी आपल्या कार्यक्रमांच्या माध्यमांतून प्रबोधन केले आहे. औरंगाबाद येथील वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवात गोंधळ ही लोककला सादर करण्याची संधी सुमित पाटिल यांना मिळाली.
तुम्हाला लाभलेल्या या लोककलेचा वारसा तुमच्याकडून असाच कायम पुढे जोपासला जाईल, हा विश्वास व्यक्त करून तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप सदिच्छा…!
यशवंतराव चव्हाण सेंटरचा "यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा रंगमंचीय कलाविष्कार पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.