नामदेव कोळी
साहित्य पुरस्कार
2024
२००६ साली नामदेव कोळी यांनी आपल्या लिखाणास सुरुवात केली. बाहेती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जळगाव येथे त्यांनी सलग नऊ वर्षे अध्यापनाचे कार्य केले. सध्या ते भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य येथे अनुवादक म्हणून कार्यरत आहेत. शब्दांच्या सामर्थ्याच्या जोरावर त्यांनी अक्ख्या महाराष्ट्रात आपला डंका गाजवला आहे.
नामदेव यांचा 2020 साली प्रकाशित झालेला ‘काळोखाच्या कविता’ हा काव्यसंग्रह खूप कमी वेळात वाचकांच्या पसंतीस उतरला. समाजाच्या अनेक अव्यक्त भावना या काव्यसंग्रहात वाचायला मिळतात. तसेच त्यांनी ‘नव-अनुष्टुभ’ याचे सहाय्यक संपादक म्हणून देखील काम पाहिले आहे. तसेच सध्या ‘वाघुर’ या दिवाळी अंकाचे संपादक म्हणून ते काम पाहतात. 'लोकसत्ता', 'लोकमत', 'दिव्य मराठी' यांसारख्या प्रतिष्ठित दैनिकांमध्ये त्यांच्या लेखनास स्थान मिळाले आहे. आकाशवाणी आणि रेडिओ सिटीवरून प्रसारित होणारे त्यांचे काव्यवाचन आजही अनेकांना प्रेरणा देते.
हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती आणि इतर भाषेतील साहित्य अनुवादांद्वारे ते आपल्या साहित्य संस्कृतींना जोडतात. नामदेव यांच्यासारख्या साहित्यीकामुळे साहित्य विश्वाला सीमांच्या पलीकडे नेऊन ठेवले आहे. हा साहित्य प्रवास जपत असताना नामदेव यांनी काळोखाच्या पलीकडे असणाऱ्या भावनांना आवाज दिला आहे.
हरहुन्नरी साहित्यिक नामदेव कोळी यांना कविता या साहित्य प्रकारासाठी यावर्षीचा यशवंतराव चव्हाण सेंटरचा “ना.धो. महानोर पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.