विजया शिंदे

राज्यस्तरीय पुरस्कार
2024

कल्याण, मुंबई येथील, कृषी विभागातील सेवानिवृत्त संशोधन अधिकारी विजया शिंदे यांनी सेवानिवृत्तीनंतर एका नव्या प्रवासाला सुरुवात केली. निष्क्रिय न राहता, त्यांनी समाजाच्या सेवेसाठी आपले जीवन समर्पित केले.

वृद्धाश्रमासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे असो किंवा पूरग्रस्त महिलांना अन्न, कपडे आणि आवश्यक वस्तू पोहोचवणे असो हे कार्य त्या करत राहिल्या. विजया ताईंनी अनेक सामाजिक आव्हानांचा सामना केला. त्यांच्या करुणेची सीमा नाही, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

त्यांनी अनाथ मुलांसाठी मदतीचा हात पुढे केला, त्यांना अन्न आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले. सांस्कृतिक उपक्रमांद्वारे त्यांनी महिलांना एकत्र केले आणि परंपरा आणि सामुदायिक भावना जोपासत भजनी मंडळे तयार केली.

सामाजिक कार्यासोबतच त्यांना साहित्याची देखील भरपूर आवड आहे. कविता, कथाकथन आणि साहित्यातील त्यांचे योगदान अधोरेखित करण्याजोगे आहे.

समाजाचा पाया म्हणजेच शिक्षण आणि विजया ताईंनी शिक्षणाचा पुरस्कार करून संस्कार केंद्र चालू केले. त्या अंतर्गत त्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. ज्येष्ठ नागरिक संघासाठी ते आध्यात्मिक वाचन, सहली आणि इतर समारंभ आयोजित करतात. त्यांच्या एकुणात कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

सेवानिवृत्ती ही विश्रांतीसाठी नसून या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, हे विजया ताईंच्या कार्यातून दिसून येते.

सेवाव्रत हाती घेतलेल्या विजया शिंदे यांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता सन्मान देताना खूप आनंद होत आहे.