यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दरवर्षी ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार’ दिला जातो. या पुरस्कार विजेत्यांची यादी चव्हाण सेंटरच्या युवा विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. चव्हाण सेंटरच्या माध्यमातून सातत्याने तरुणांसाठी प्रोत्साहनपर विविध कार्यक्रम घेतले जातात. त्याचाच एक भाग म्हणून सामाजिक, क्रीडा, उद्योजकता, रंगमंचीय कलाविष्कार, साहित्य, पत्रकारिता आणि इनोव्हेशन क्षेत्रांतील विविध गुणवंत युवकांना या पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते.
या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जयंती दिनी शुक्रवार, दिनांक ३० मे २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता रुक्मिणी सभागृह, एमजीएम परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. सर्व पुरस्कारांचे स्वरूप रुपये एकवीस हजार आणि सन्मानचिन्ह असे असणार आहे.
यंदाचा २०२४ सालचा युवा क्रीडा पुरस्कार हृतिका श्रीराम (स्विमिंग), ओजस देवतळे (आर्चरी) यांना जाहीर झाला आहे.
सामाजिक युवा पुरस्कारात सामजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ऋतुजा जेवे व आकाश टाले यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्राला कला-साहित्याची मोठी परंपरा आहे. अनेक कलांचे उगमस्थान असलेल्या या भूमीतील रंगमंचीय कलाविष्कार (परफॉर्मिंग आर्ट्स) सादर करणाऱ्या युवांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये तन्वी पालव (शास्त्रीय नृत्य), कृष्णाई उळेकर (लोककला), कल्पेश समेळ (नाट्य)आणि ऋतुजा सोनवणे (शास्त्रीय संगीत) यांना जाहीर झाला आहे.
मराठी भाषेत मागील पाच वर्षांत साहित्यकृतींचे लिखाण करणाऱ्या युवक व युवतींना साहित्य युवा पुरस्कार २०२४ देऊन गौरव करण्यात येत आहे. या पुरस्कारांमध्ये विनायक होगाडे, मृदगंधा दिक्षित यांची निवड करण्यात आली आहे.
आपल्या उद्योगाच्या माध्यमातून कमीत कमी पाच वर्षांत यशस्वीपणे आपला उद्योग चालवत,त्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत,पर्यावरणीय समतोल व शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या उद्योग धंद्यात विविध प्रयोग करीत तसेच रोजगाराची निर्मिती करीत आपल्या भागात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या जयेश टोपे, शिवानी सोनवणे या युवा उद्योजकांना ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा उद्योजकता पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
पत्रकारिता युवा पुरस्कारात पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रथमेश पाटील, ज्योती वाय. एल. यांची निवड करण्यात आली आहे. तसेच इनोव्हेशन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पद्मजा राजगुरू, सुश्रुत पाटील यांना युवा इनोव्हेटर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.