यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सर्व जिल्हा केंद्रांची राज्यस्तरीय आढावा बैठक गुरुवार दि. ४ मे रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे पार पडली. या बैठकीमध्ये चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे यांनी उपस्थित राहून जिल्हा केंद्रांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी घालून दिलेला समाजकारणाचा वस्तुपाठ पुढे कायम चालू ठेवण्यासाठी चव्हाण सेंटरचा प्रत्येक सदस्य अतिशय काटेकोरपणे प्रयत्न करीत आहे. चव्हाण साहेबांचे विचार आणि त्यांनी तळागाळातील लोकांसाठी पाहिलेले स्वप्न पुढे घेऊन जाण्यासाठी आणि नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कार्यरत असणारी चव्हाण सेंटरची जिल्हा केंद्रे अतिशय उत्कृष्टपणे काम करीत आहेत. अशा शब्दात सुप्रियाताईंनी सर्व जिल्हा केंद्रांच्या कामाचे कौतुक केले.
राज्यभरामध्ये चव्हाण सेंटरच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करणाऱ्या ठाणे, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, आंबेजोगाई (बीड), नांदेड, नागपूर, बुलढाणा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि नवी मुंबई या जिल्हा केंद्रांचा सन्मान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या स्वयंसेवकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. डाॅ.माधव सूर्यवंशी (शिक्षण विभाग) आणि अजित तिजोरे (शिक्षण विभाग), रणजीत बायस (युवा विभाग), सुबोध जाधव (युवा विभाग), अशोक सोळंकी (आरोग्य विभाग) या उत्कृष्ट काम करणाऱ्या स्वयंसेवकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच भूषण काळे(युवा विभाग), अभिजित जोंधळे (युवा विभाग) आणि रवींद्र झेंडे (आरोग्य विभाग) यांना गौरविण्यात येणार आहे.
यावेळी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिप्ती नाखले यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याचा आढावा घेत आगामी काळात घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. कोषाध्यक्ष हेमंत टकले आणि कार्यकारी समिती सदस्य अजित निंबाळकर यांनी देखील विविध विषयांवर प्रतिनिधींशी संवाद साधला. सर्व जिल्हा केंद्रांच्या प्रतिनिधींनी चव्हाण प्रत्येक जिल्ह्यामध्ये चव्हाण सेंटरद्वारे राबवित असलेले उपक्रम आणि आगामी काळातील नियोजन यावर उत्तम असे सादरीकरण केले. त्याचबरोबर दत्ता बाळसराफ यांनी चव्हाण सेंटरच्या माध्यमातून विविध संस्थांच्या सहयोगाने सामाजिक उपक्रम राबविण्याबाबत सेंटरच्या कार्याचा आढावा मांडला. याचबरोबर सतिश पवार यांनी चव्हाण सेंटरच्या कामकाजामधील माहिती तंत्रज्ञान व सोशल मीडियाचा वापर यावर सादरीकरण केले. अनिल पाझारे आणि महेश चौधरी यांनी जिल्हा केंद्रांशी संबधीत महत्त्वपूर्ण बाबींचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे निलेश राऊत यांनी सूत्रसंचालन केले.
जीवनराव गोरे, विजय कान्हेकर यांच्यासह सर्व जिल्हा केंद्रांचे अध्यक्ष, सचिव व पदाधिकारी, चव्हाण सेंटरचे सदस्य, अधिकारी, कर्मचारी आदी या बैठकीला उपस्थित होते. सर्व जिल्हा केंद्रांचे प्रतिनिधी आवर्जून वेळ काढून बैठकीसाठी उपस्थित राहीले, याबद्दल चव्हाण सेंटरच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.