महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण हे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून मानले जातात. त्यांची कारकीर्द आजही आदर्श समजली जाते. राजकीय , सामाजिक , आर्थिक , प्रशासकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या लक्षणीय कामगिरीमुळे राष्ट्रीय जीवनात महाराष्ट्राला गौरवास्पद स्थान प्राप्त झाले. प्रखर स्वातंत्र्यसेनानी , कुशल मुत्सद्दी , सुसंस्कृत लोकाग्रणी म्हणून त्याचे स्थान लोकमानसात चिरंतन राहणार आहे. त्यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा जतन करुन सार्वजनिक हिताचे विविध उपक्रम हाती घेण्याच्या उद्देशाने १९८५ साली यशवंतराव चव्हाण सेंटरची स्थापना झाली.
यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे दरवर्षी यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात येते. हे पारितोषिक महाराष्ट्रातील व्यक्ती किंवा संस्थेस देण्यात येते. हे पारितोषिक कृषि औद्योगिक समाज रचना , व्यवस्थापन प्रशासन , सामाजिक एकात्मता , विज्ञान - तंत्रज्ञान , ग्रामीण विकास , मराठी साहित्य व संस्कृति या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रात भरीव व पथदर्शी कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेस देण्यात येते. दोन लाख रुपये व सन्मानपत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.
सदर पारितोषिकासाठी सुयोग्य संस्था वा व्यक्तींची नावे विहित पद्धतीनुसार सुचविण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग , नरिमन पॉईट , मुंबई ४०० ०२१ या पत्त्यावर पाठवावीत किंवा चव्हाण सेंटर च्या वेबसाईटवर अपलोड करावीत.
या पारितोषिकांसाठी नावे पाठविण्याची अखेरची तारीख ३० सप्टेंबर २०२२ आहे.